मुंबई : राज्यात एकीकडे करोना लसीकरणाची तयारी सुरु असतानाच महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले आहेत,” असं राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनावरील बहुप्रतिक्षित लसीचा पहिला साठा आज मुंबईत पोहोचला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने येथील कोव्हिशील्ड लसीचे १ लाख ३९ हजार ५०० डोस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईत आणले गेले. हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आला आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात लसीचा हा साठा मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुण्याहून आणला. देभभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे. त्यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील साठा दाखल होत असला तरी पालिकेच्या कांजुरमार्ग येथील मार्केट इमारतीत लशींसाठी कोल्ड स्टोरेज काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
त्यामुळं लस साठवणूक करण्याची व्यवस्था पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात करण्यात आली आहे. कांजुरमार्ग येथील कोल्डस्टोरेजची क्षमता एकाच वेळी सुमारे एक कोटी लशींच्या साठवणुकीची आहे. तर एफ दक्षिण विभाग कार्यालयातील लस क्षमता १० लाख इतकी आहे.
दोन लाख जणांना लस
मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर संबंधित कर्मचारी अशा २ लाख व्यक्तींची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख जणांना लस दिली जाईल.
शाळा, सभागृहांचाही उपयोग
मुंबईत केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयांत लसीकरण प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे, बीकेसीतील केंद्रासह पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, आरोग्य केंद्रामध्येही लसीकरण होणार आहे. त्या जोडीला पुढील कालावधीत शाळा आणि परिसरातील सभागृहांचाही त्यासाठी उपयोग केला जाईल.
प्रशिक्षणावर भर
लसीकरण यशस्वी व्हावे यासाठी पालिकेने २७५ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या मदतीने २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. लसीकरण वेगवान आणि सुरक्षित होण्यासाठी आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची निवड झाली असून त्यातील ५ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे.